लखनौ : उत्तर प्रदेशातीलमथुरा जिल्ह्यात मंगळवारी पहाटे भीषण रस्ता अपघात झाला. राया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यमुना एक्सप्रेसवेवर एका व्होल्वो बसने कंटनेरला जोरदार धडक दिली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, २० ते २५ प्रवासी जखमी झाले. या अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास यमुना एक्सप्रेसवेवरील ११२ ते ११३ मैलाच्या दगडादरम्यान घडला. गोला बस सर्व्हिसची व्होल्वो बस कंटेनरवर मागून आदळली. धडक इतकी भीषण होती की, बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातावेळी बसमध्ये सुमारे ६५ प्रवासी प्रवास करत होते.
अपघाताची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण), क्षेत्राधिकारी महावन, राया पोलीस, एसडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून तातडीने मथुरा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने बसमधील सुमारे ३५ सुरक्षित प्रवाशांसाठी पर्यायी वाहनांची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी रवाना केले. अपघातात मृत्यू झालेल्या चौघांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे कामही सुरू आहे.
या भीषण अपघातानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत यमुना एक्सप्रेसवेवरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवली. प्राथमिक तपासात अतिवेग किंवा चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.